महसूल सप्ताहानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई (टीम – बातमीपत्र)
महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
महसूल सप्ताहाचे आयोजन तसेच राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी या निमित्ताने मंत्री श्री. विखे-पाटील यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. दरम्यान, महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबाबत मार्गदर्शनही त्यांनी केले.
श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्य शासन प्रथमच महसूल सप्ताह साजरा करणार आहे, तरी हा सप्ताह महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे यशस्वी करावा. महसूल सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामुळे महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळेल. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यात एकोपा निर्माण होईल. तसेच महसूल विभागातील जे अधिकारी कर्मचारी यांचे पाल्य कौतुकास्पद कामगिरी करत आहेत, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचाही गौरव सोहळा आयोजित करावा, असे श्री. विखे-पाटील यांनी नमूद केले.
श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग येथे सप्ताहाचे फ्लेक्स लावावे, सप्ताहाच्या परिपत्रकाची प्रसिद्धी करावी. या सप्ताहाच्या निमित्ताने आयुक्तांनी संबंधित तालुक्यात व जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेट द्यावी. सप्ताह निमित्त जनजागृती करावी. तसेच सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम रेवेन्यू मिनिस्टरच्या डॅशबोर्डवर अपलोड करावे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. महसूल कार्यालयांची स्वच्छता राखावी. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.