नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेजुरी (टीम – बातमीपत्र)
लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद दिसत होता. राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेला.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी १०९ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील.
शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले .
कार्यक्रमाला आमदार सर्वश्री दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनावणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.