कृषीराज्य

भुमी अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई (टीम-बातमीपत्र)
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला, 12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी आणि कृषी अधिकारी यांची संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून तीनही अटींची पूर्तता करायची आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या ‘नमो किसान सन्मान योजने’चा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे काम केले जाणार आहे.

याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आणि ‘नमो किसान सन्मान योजने’चाही लाभ मिळणार आहे.

जे पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!