खा.सुप्रिया सुळेच्या दौऱ्याकडे आ.भरणे यांची पाठ – गजानन वाकसे
इंदापूर (राहुल ढवळे- टीम बातमीपत्र)
बारामती लोकसभेच्या खा. सुप्रिया सुळे ह्या नेहमीप्रमाणे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आज (दि.11) सप्टेंबर रोजी आल्या होत्या. मात्र या दौऱ्याकडे त्यांचे बरोबर नेहमी सावली सारखे असणारे आ.दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांनी पाठ फिरवली आहे. इंदापूर मतदारसंघात खा.सुप्रिया सुळे ह्या दौऱ्यावर आल्यावरती अनुपस्थित राहणाऱ्या आ.भरणे यांना आता खा. सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियावर फोटो वापरण्याचा तसेच नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे मा.सरचिटणीस गजानन वाकसे यांनी केली आहे.
आ. भरणे तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी आता खा. सुळे यांच्या दौऱ्याला दांडी मारु लागल्याने जोरदार चर्चा राष्ट्रवादी कार्यकर्त्यात सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे आमच्या नेत्या आहेत, आम्ही सर्व एक आहोत असे जाहीररीत्या सभेत सांगणारे तसेच फ्लेक्स बोर्डवर खा. सुप्रिया सुळेचे छायाचित्र लावणारे आमदार भरणे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या समवेत जाण्याचे जाणून-बुजून टाळल्याचे दिसून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत नेहमी दिसणारे आमदार व पदाधिकाऱ्यांनी खा . सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याकडे चक्क पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे, असे वाकसे यांनी नमूद केले. दरम्यान आमदार भरणे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे खा. सुळे यांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहत असल्याने तालुक्यातील जनतेमध्ये व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तो चर्चेचा विषय झाला आहे.