पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर ‘देऊळबंद’…..
यवत (टीम – बातमीपत्र)
पुणे जिल्ह्यातील दौंड आणि पुरंदर तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या भुलेश्वर मंदिराला स्थानिक ग्रामस्थांनी म्हणजेच माळशिरस ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी अचानक टाळे ठोकले आहे.त्यामुळे या भागात वादाचे चिन्ह निर्माण झाले आहेत.
भुलेश्वर मंदिर पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते साधारणपणे जवळपास पाच लाखाहून अधिक भाविक संपूर्ण श्रावण महिना काळात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
चालू वर्षी स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी समिती तयार करून वाहनकर लावला होता आणि चार चाकी वाहने आणि दुचाकी वाहने मंदिरापर्यंत सोडण्यास मज्जाव करण्यात आला होता परंतु यवत परिसरातील स्थानिक नागरिकांनी आम्ही मंदिराचे वर्षानुवर्ष भाविक असून आम्हाला या ठिकाणी या वाहनकारातून सवलत मिळावी म्हणून मागणी केली होती या मागणीवरून दौंड तालुक्यातील ग्रामस्थांनी पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण झाला होता तो वाद मिटल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मंदिर हद्द असणारे जेजुरी पोलीस स्टेशन यांनी दोन्ही ग्रामस्थांचा बैठकीत वाद मिटवला होता.
परंतु मंगळवारी अचानक या ठिकाणी ग्रामस्थांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाला टाळे लावल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले .जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असून ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे.यावेळी मंदिर हद्द असणारे पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावात देखील बंद पाळण्यात आला आहे.