भिमा पाटस सुरू झाल्याने आडवा आडवी करणारे खाजगी कारखाने आता काय एरंडी गाळणार का? – पांडुरंग मेरगळ
दौंड (टीम- बातमीपत्र)
भीमा पाटस कारखाना अनेक वर्ष बंद असल्यामुळे खाजगी कारखान्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. राजकीय स्वार्थापायी काही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदी रद्द केल्या. मात्र सध्या भीमा पाटस कारखाना सुरळीत सुरू झाला असून काही कारखान्यांनी स्वतःची गाळात क्षमता वाढवली असली तरी शेतकरी त्यांना ऊस देण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे ते आता काय एरंडी गाळणार का असा सवाल ज्येष्ठ नेते पांडुरंग मेरगळ यांनी उपस्थित केला.
भिमा पाटस कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कारखाना स्थळावर पार पडली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शितोळे यांचा अहवालात फोटो नसल्यामुळे माजी आमदार रमेश थोरात समर्थक सभासदांनी पाटस गाव ते भीमा पाटस कारखाना असा मोर्चा काढून आमदार राहुल कुल व संचालक मंडळाचा निषेध केला. त्या विरोधात आमदार राहुल कुल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला विरोधक उपस्थित राहत नसल्याचा आरोप करत विरोधकांच्या सवालांना उत्तरे दिली.
दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग मेरगळ यांनी माइकचा ताबा घेत अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की,कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्या विरोधात मी काम करतो. 2014 ची विधानसभेची निवडणूक मी त्यांच्या विरोधात लढवली. मात्र भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी आमदार कुल यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली. तसेच मुळशी धरणाच्या पाण्यासाठी ते आग्रही असल्यामुळे आ.कुल यांचे अभिनंदन करत असल्याचे सांगितले.
तसेच भीमा पाटस कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्व भागामध्ये दौंड शुगर कारखाना असून या भागात राजकीय द्वेषापायी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंद कारखान्यावर केली असताना देखील त्यांच्या उसाच्या नोंदी रद्द करण्यात आल्या. परिणामी शेतकऱ्यांना आपला ऊस तालुक्या बाहेरील कारखान्यांना द्यावा लागला. काही कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊसाचे बिल न मिळाल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. सध्या मात्र दौंड शुगर कारखान्याची गाळप क्षमता 18 हजार मे. टन करण्यात आली असून शेतकऱ्यांची मानसिकता ही भीमा पाटस कारखान्याला ऊस देण्याची आहे. त्यामुळे ऊस न मिळाल्यास कारखाना आता काय एरंडी गाळणार का? असा सवाल उपस्थित करत विरोधकांना जोरदार चपराक दिली. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन कारखान्यांमध्ये २५ कि.मी. हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी कुल यांनी प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर
सर्व सभासदांमध्ये ज्येष्ठ नेते पांडुरंग मेरगळ यांच्या वक्तव्याची चर्चा होती.