आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहरविशेष बातमी

पुण्याच्या ससून रुग्णालयात लठ्ठपणा कमी करण्याची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी…

पुणे( टीम – बातमीपत्र)
ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यात ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया) यशस्वी केल्या असून याअतंर्गत एका ३३ वर्षीय तरुणाची बॅरिएट्रिक सर्जरी आज ससून रुग्णालयात करण्यात आली.

ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १० महिने मोफत शस्त्रक्रिया रुग्णसेवेत आणली आहे. हर्निया, पित्ताशय, अपेंडिक्स, मुळव्याधी, बेरिएट्रिक सर्जरी अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया ससूनमध्ये मोफत केल्या जातात. स्थूलत्व जनजागृती अभियानांतर्गत बॅरिएट्रिक सर्जरी करण्यात आल्या आहेत.

सोलापूर येथील ३३ वर्षीय तरुण रुग्ण गेले अनेक वर्ष लठ्ठपणामुळे त्रासलेला होता. वाढत्या वजनामुळे थकवा, काम करण्यास आळस या सोबतच रुग्णाला रक्तदाब, मधुमेह, संधिवात व हृदयरोगाचादेखील धोका होण्याची शक्यता डॉक्टरांमार्फत दर्शविण्यात आली होती. रुग्णाचे अतिरिक्त काम हे बसून असल्यामुळे व व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्यांचे वजन वाढले होते. वाढत्या वजनावर बरेच उपाय करूनही त्यांना मनासारखे परिणाम मिळाले नाही.

ससूनमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी होऊन वजन कमी झालेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे ससूनमध्ये स्थूलत्व विभागअंतर्गत दर सोमवारी सुरु असलेल्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णाने भेट दिली असता त्याला शस्त्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली.

रुग्णाने आपली बॅरिऍट्रिक सर्जरी करण्याचे ठरविले. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी दाखल रुग्णावर आज अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमेय ठाकूर, डॉ. चैतन्य गायकवाड व सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली.

या रुग्णावर बॅरिएट्रिक सर्जरीचा एक प्रकार असलेली ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी’ प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत जठराचा काही भाग रुग्णाच्या ‘बीएमआय’ला अनुसरून कमी करण्यात येतो. जेणेकरून भविष्यात आपल्या शरीराला पुरेल इतकेच अन्न रुग्ण सेवन करू शकतो. बॅरिऍट्रिक शस्त्रक्रिया ही जगभरात कॉस्मेटिक सर्जरी म्हणून ओळखली जात आहे. परंतु ह्या सर्जरीमार्फत रुग्णाच्या शरीराला होणाऱ्या धोकादायक आजारांपासून वाचविले जाऊ शकते व यामुळे ही शस्त्रक्रिया जीवनरक्षक शस्त्रक्रिया आहे, असे डॉ. अमेय ठाकूर म्हणाले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!