बिबट्याचा वावर लोकवस्तीकडे , वनविभाग अपयशी !
राहु (टीम – बातमीपत्र)
राहूबेट (ता.दौंड) परिसरात बिबट्या सदृश्य वन्यप्राण्यांची पैदास दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर नियंत्रण ठेवणे आता कठीण जात असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ वन्यप्राणी आता लोकवस्तीच्या दिशेने झेपापावत असल्याची परिस्थिती आहे.बिबट्या मादी बछड्यांसह मुक्तपणे संचार करत असल्याचे नागरिकांच्या नजरेस येत आहे.पिंजरा लावणे किंवा इतर उपाययोजनेबाबत वन विभाग पूर्णपणे हतबल झाले असून कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नाही.
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील संपूर्ण राहुबेट परिसर हा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो.परिसरामध्ये भीमा आणि मुळा-मुठा बारमाही नद्यांच्या पाण्याने बागायती क्षेत्र समृद्ध आहे.परिणामी वन्यप्राण्यांना लपण्यासाठी फार मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे वन्यप्राण्यांनी या भागात आश्रय घेतल्याचे दिसत आहे.सहा वर्षांपूर्वी देवकरवाडी येथे वन विभागाला तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले होते.परंतु त्यानंतरच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पैदास वाढल्याने राजरोसपणे बिबट्या मादी तिच्या पिलांसह विविध ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे दिसत आहे.बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावर रात्री-अपरात्री हल्ले करुन अनेक शेळ्या-मेंढ्या कालवडी याचबरोबर रानडुकरांचा फडशा पाडलेला आहे.रानडुकरांचे प्रमाण कमी झाल्याने पाळीव कुत्र्यांवरील हल्ले वाढत चालले आहेत.परिणामी राहू गावठाणात बिबट्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला करताना अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे.परीसरात वन्यप्राण्यांची संख्या नेमकी किती आहे याचा अंदाज वनविभागाला देखील आलेला नसून वन्य प्राणी मात्र आता भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.