चौकात बसणारा तो मुलगा झाला यशस्वी व्यावसायिक पुण्यातील प्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर टीम जगदंबला रियल अचिव्हर्स हा पूरस्कार प्रदान
पुणे (टीम बातमीपत्र) ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन पुणे आणि लेखक गौतम कोतवाल लिखित ‘रियल अचिव्हर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पत्रकार भवन पुणे येथे पार पडला. यावेळी ‘जगदंब क्रिएटीव्ह हब’ चे सर्वेसर्वा लवकेश रमेश काची यांना रियल अचिव्हर्स या पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लेखक गौतम कोतवाल यांनी या पुस्तकात काही हरहुन्नरी निवडक व्यक्तींचा व्यावसायिक प्रवास मांडला आहे. परिस्थितीच्या प्रतिकुलतेवर आपल्या जिद्दीने मात करून यशाची शिखरे गाठणाऱ्या युवा उद्योजकांची निवड या पुस्तकासाठी करण्यात आली आहे. या पुस्तकातून लवकेश काची यांचा ‘चौकात बसणारा मुलगा ते यशस्वी व्यावसायिक’ हा अनोखा पण मनाला उभारी देणारा प्रवास मांडला आहे. त्यांचे शालेय जीवन, मंडईतील दादागिरीची त्यांना लागलेली हवा, कॉलेज मधील तास बुडवून चाललेली मजामस्ती, फसलेला हॉटेल व्यवसाय त्यानंतर जाणवलेली चित्रकलेची आवड आणि ग्राफिक्स क्षेत्रात हळुहळु होत गेलेली प्रगती याचे वर्णन केलेले दिसून येते.
मंडईच्या हाणामारी, गुंडगिरीच्या वातावरणात राहूनही काची आज यशस्वी व्यावसायिक कसे झाले? त्यांना कोणकोणत्या संघर्षांना सामोरे जावे लागले? याबद्दल लेखकांनी अतिशय मोकळेपणाने चर्चा केलेली आहे.
यावेळी जगदंब चे लवकेश यांनी सांगितले कि, ”शिक्षण संपत आलं तरी योग्य दिशा नाही, गावगप्पा, टवाळक्या आला दिवस ढकलणे असं सर्व सुरु असताना सुरु केलेला व अल्पावधीत बंद पडलेला हॉटेल व्यवसाय हे सगळं सुरु होत. काही कामाला नाही आलं कि कला कामाला येते. चित्रकला आणि हळू हळू ग्राफिक्स ने बळ दिलं. आज जाहिरातींच्या स्पर्धेतही कला टिकून आहे. आपलं काम आणि मेहनत आणि आपले मार्गदर्शक यांवर विश्वास ठेऊन प्रामाणिकपणे आपला कल ओळखून व्यवसाय सुरु करा. नक्की यश मिळेल असा सल्ला काची यांनी नवउद्योजकांना दिला.
या कार्यक्रमाला यंग अचिव्हर्स चे सर्व मानकरी, अध्यक्षस्थानी शेखर मुंदडा, तर राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.