मधुमेह नियंत्रण – आयुर्वेद आणि योगशास्त्र
पुणे(टीम – बातमीपत्र)
मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी असा कोणताच इलाज नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्याला मधुमेह असल्याचे निदान झाले तर हा आजार त्याला आयुष्यभर सोडत नाही. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जो स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा होतो. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेला एक हार्मोन आहे जे खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास अनुमती देते. तज्ज्ञांच्या मते चुकीची लाइफस्टाइल आणि आहारामुळे मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास ते धोकादायक रूप घेऊ शकते.
आयुर्वेदिक उपचार, योग्य आहार आणि योगासने यांच्या मदतीने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. आयुर्वेदामध्ये औषधासोबतच पथ्य अपथ्य आणि आहाराला देखील तेवढेच महत्त्व आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण काही छोटे छोटे बदल करू शकतो जसे जसे तांदूळ शिजवत असताना तांदूळ हा जुना असावा जर जुना नसल्यास तो भाजून घ्यावा व त्यानंतर त्यामध्ये सुंठ,ओवा,मेथी यांपैकी एक तुकडा टाकून त्याचा भात बनवावा. कुकर मध्ये शिजवलेला भात शक्यतो टाळावा.तसेच चपाती अथवा पोळी ऐवजी फुलके खावे.पालेभाज्यांसोबतच कारले, शेवगा, तोडले, पडवळ, कोहळा दुधी भोपळा यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.
मधुमेहामध्ये व्हिटॅमिन सी गुणधर्मांनी समृद्ध आवळा स्वादुपिंडाच्या उपचारांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. आवळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय यामध्ये क्रोमियम असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. आवळा कच्चा, मुरंबा, लोणचे किंवा पावडर कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतो. जांभळाच्या बिया मधुमेहावरील सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहेत. याच्या बियांमध्ये जांबोलिन आणि जॅम्बोसिन संयुगे जास्त प्रमाणात असतात. हे दोन घटक रक्तातील ग्लुकोज सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
आवळ्या जांभूळ सोबतच ,अंजीर, देशी केळी, बेलफळ, डाळिंब, कोकम यांचा देखील आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरते.
आपल्या प्रदेशात तयार होणाऱ्या तेलाचा वापर करावा. गाईचे तूप – दूध यांचा आहारात समावेश करावा.
तहान लागल्यावर उकळून गार केलेले शक्यतो सुंठ वाळा अथवा नागरमोथा घातलेले पाणी प्यावे.
आहाराचा नियम सोबतच शारीरिक हालचाल देखील महत्त्वाची आहे त्यामुळे रोज योगासने आणि प्राणायाम करायला पाहिजेत.
जानू शीर्षासन,पश्चिमोत्तानासन या आसनांमुळे यकृत आणि प्लीहा यांचे कार्य सुधारते, पचनाला मदत होते. अर्धनावासन केल्याने यकृत पित्ताशय, प्लीहा यांचे कार्य सुधारते. मण्डुकासनामध्ये पोटातील स्नायू जमिनीवर दाबले जात असल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होते. मरीचासन, अर्ध मच्छिंद्रसन आसन यामुळे यकृत प्लीहा आकुंचित होतात व त्यांचे कार्य सुधारते त्यांच्या कार्यामध्ये आलेला अडथळा दूर होतो. यांसारख्या आसन आणि प्राणायाम यांचा नियमित सातत्याने योग्य मार्गदर्शनाखाली सराव केला गेला पाहिजे.
मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो.
सध्या भारतामध्ये प्री डायबिटीस असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे व्याधी होऊच नये म्हणून काळजी घेण्यासाठी आयुर्वेद आणि योग यांचा आपण नक्कीच आधार घेऊ शकतो.जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर वेळोवेळी योग्य आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेऊन मधुमेह नियंत्रनात आणता येऊ शकतो. ————-
डॉ. पायल विलास चावत
एम.डी. स्कॉलर
योग शिक्षक आणि मूल्यांकनकर्ता