दौंड तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांची वरवंडला सभा , सभेसाठी जोरदार तयारी सुरु……….
दौंड(टीम – बातमीपत्र)
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथील मराठा आरक्षण प्रश्नी दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर उपचारानंतर तातडीने महाराष्ट्रभर दौरा करण्याचे नियोजन केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील पहिली सभा दि.१६ नोव्हेंबर रोजी दौंड तालुक्यातील वरवंड येथील बाजार मैदानात सकाळी अकरा वाजता होणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मराठा समाज व समन्वयक समितीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सभेसाठी तालुक्यात ठीक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. तर प्रत्येक गावोगावी बैठका ही सुरू झाल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर देखिल मोठ्या प्रमाणात याची माहिती टाकली जात आहे.
सभेची तयारी, नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा, स्वयंसेवक, स्वच्छता , पाणी, आदीबाबत समन्वयक समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. या सभेसाठी एक लाख समाज बांधव जमा होतील असा अंदाज समन्वयक समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्या दृष्टिकोनातून समितीने नियोजन केले असल्याची माहिती समितीने दिली आहे.
दि.१३ रोजी वरवंड ( ता.दौंड) येथील सभास्थळाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, नागरगोजे यांनी केली आहे.