राज्यविशेष बातमी

रेल्वे आरपीएफच्या “मिशन जीवन रक्षक” ने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान ६६ लोकांचे प्राण वाचवत २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवले…..

पुणे (टीम – बातमीपत्र)
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर जीव वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावत असतात. एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी “मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचवले आहेत.
यामध्ये मुंबई विभागात १९ ,भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४, आणि सोलापूर विभागात ५ पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवला आहे. पण सरतेशेवटी, वाचवणाऱ्यांच्या या कृतीचा परिणाम आनंद आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख इ. परत मिळवून दिले आहेत.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे. या ८५७ प्रवाशांपैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहेतः
भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख रु. किमतीचे सामान; नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख रु. किमतीचे सामान; पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख रु. किमतीचे सामान; सोलापूर विभाग ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख रु. किमतीचे सामान आहे.
रेल्वे संरक्षण दलाच्या या सैनिकांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असा करता येईल. आणि त्यांनी अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना, धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये असे आवाहन करीत आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!