दौंड शुगर कारखान्यात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू !…………..
देऊळगाव (टीम – बातमीपत्र)
आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यांत आज दि.३ रोजी सकाळी एक दुर्घटना घडली असून यामध्ये दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याप्रकरणी दौंड पोलिसांनी आकस्मित मुत्यृची नोंद करण्यात आली आहे.
या दुर्घटनेमध्ये संदीप कुंडलिक गरदाडे ( वय २३, रा.पेडगाव ता.दौंड ),गणेश सिताराम शिंदे ( वय २३,रा.शेडगाव पिसारे,ता.करमाळा,जि.सोलापुर ) या कामगारांचा मुत्यृ झाला आहे . याबाबत फारुक दुगे यांनी पोलिसांना खबर दिली आहे.
कारखान्यांच्या नवीन प्लॅटच्या इजकराम चॅनलच्या गरम पाण्याचे टाकी लाईनमध्ये संदीप हा फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होता.
यावेळी एका गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरुन तो पडला,त्याला टाकीत पडलेला पाहून खलाशी म्हणुन काम करीत असलेला गणेश वाचविण्यासाठी गेला असता तो पण टाकीत पडला. दोघांना इतरांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढले असता ते मयत झाल्याचे दिसुन आले. त्यांना उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत करीत आहेत.