पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

आमदार राहुल कुलांनी करून दाखवले, स्वतंत्र दौंड प्रांत कार्यालयाचे उद्या उद्घाटन..!

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती केल्याचे समाधान - आमदार राहुल कुल

दौंड (टीम – बातमीपत्र)

दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालय व्हावे यासाठी सुरुवातीपासून आम्ही प्रयत्न करत होतो. या कामाला यश आले असुन दौंडसाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय दौंड प्रशासकीय इमारतीत सुरू होणार असून या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन (दि. 10) रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दौंड उपविभागीय (प्रांत) कार्यालय हे विशेष बाब म्हणून या महायुतीच्या सरकारने मंजुर करून दिले आहे. या उपविभागीय (प्रांत) कार्यालयामुळे तालुक्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. दौंड तालुक्यातील जनतेला निवडणुकीच्या वेळी हे कार्यालय दौंड मध्ये आणणारच असा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केल्याने मला समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच दौंड शहरातील अनेक दिवसांपासून क्रीडा संकुलची मागणी होती तो प्रश्नही मार्गी लागला असून क्रीडा संकुलचेही हस्तांतरण यावेळी होणार आहे. तसेच दौंड-गोपाळवाडी रोडच्या कामाचे भूमिपूजनही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन, क्रीडा संकुलाचे हस्तांतरण व दौंड – गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार अॅड. कुल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!