लिलावाच्या नावाखाली वाळू चोरी, दौंड तहसिलदारांची कारवाई …….
दौंड (टीम – बातमीपत्र)
कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रात लिलावाच्या नावाखाली रात्रंदिवस सुरू असलेल्या बेसुमार वाळूच्या उपशावर दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी कारवाई केली आहे . यामध्ये वाळूने भरलेला ट्रक, पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉली व व दोन फायबर बोटी असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे.), सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कानगाव (ता. दौंड). येथील भीमा नदीपात्रात मागील काही दिवसांपासून वाळू उपसा सुरू होता.
या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा स्तरीय गौण खनिज पथकाच्या पथक प्रमुख नायब तहसीलदार ज्योती देवरे आणि दौंड तहसीलदार यांच्याकडे तक्रारी गेल्याने तहसीलदार अरुण शेलार यांनी (दि. १२) रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकासह भीमा नदीच्या पात्रात धाड टाकली.
याप्रसंगी दत्त मंदीराच्या पाठीमागे आणि स्मशानभूमी जवळ भीमा नदीच्या पात्रात दोन फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून त्याची ट्रक आणि ट्रॉलीच्या साह्याने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारवाईसाठी पथक आल्याने अंधाराचा फायदा घेऊन वाळु लिलाव धारक सुयेश ट्रान्सपोर्ट तर्फे सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या तर्फे हजर असलेले) संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे) तसेच त्याचे इतर साथीदार तेथुन पळून गेले.
तहसीलदारांनी एक ट्रक व पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या तसेच भिमा नदीपात्रामध्ये वाळु उत्खन्न करणा-या दोन सेक्शन बोटी, अंदाजे ७ ब्रास वाळु असा एकूण ११ लाख १० हजार किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी तहसीलदार अरुण शेलार यांच्या आदेशानुसार तलाठी शंकर दिवेकर यांनी फिर्याद दिल्याने वाळु लिलाव धारक सुयेश ट्रान्सपोर्ट तर्फे सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर ) व संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे.) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.