न्याय मागणाऱ्याला त्याच्या हयातीतच न्याय मिळाला तर तो योग्य ठरतो, ही जबाबदारी न्यायाधीश आणि वकील दोघांची – न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे
दौंड (टीम – बातमीपत्र)
न्यायालयाला मंदिराची उपमा दिली आहे त्यामुळे त्या मंदिराची पवित्रता जपणे ही न्यायाधीश आणि वकील दोघांची जबाबदारी आहे. एखादा वाद तंटा प्राथमिक स्तरावरच मिटत असेल तर तो वाद मिटवण्याची जबाबदारी वकिलांची आहे. पुढची तारीख घेण्याचा पायंडा मोडला पाहिजे न्याय मागणाऱ्याला त्याच्या हयातीतच न्याय मिळाला तर तो योग्य ठरतो, ही जबाबदारी न्यायाधीश आणि वकील दोघांची असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांनी व्यक्त केले.
दौंड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले .उपस्थित न्यायमूर्तींच्या हस्ते नूतन न्यायालयाच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश कालिदास नांदेडकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए एम जोशी, दौंड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश जी बी गोयल खेडकर, एस बी काळदाते, एस डी मुक्कनवार, ए जी लागारे कुलकर्णी, जी ए कुलकर्णी, एन ए मोर, व्ही बी चौगुले,
दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य, हर्षल निंबाळकर, ए यु पठाण,राजेंद्र उमाप दौंड,बारामती, इंदापूर, श्रीगोंदा, कर्जत वकिल संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे म्हणाल्या , हक्काची आणि अधिकाऱांची जाणीव वाढल्याने सध्या खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.ज्युनियर शिकाऊ वकिलांनी अभ्यासपूर्ण केस लढवणे अत्यंत गरजेचे आहे कारण योग्य पुरावा दिला गेला नाही तर पुढे अपीलातही मोठा वकील देऊनही काही फरक पडत नाही.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी वकिलांना मार्गदर्शन करताना सांगितले एक्सेस टू जस्टीस ,न्याय सर्वांसाठी यासाठी न्यायालय जनतेपर्यंत जात आहे. जिल्ह्याचे न्यायालय आता तालुक्यात होत आहे त्यामुळे तेथील वकिलांनी आपला अभ्यास व दर्जा वाढवण्याची गरज आहे. दर्जा वाढवून खटल्यांचा निपटारा करण्यासाठी न्यायव्यवस्थेला मदत होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी दौंड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर होण्यासाठी प्रयत्न केलेल्या वकील संघटनेचे सदस्य दहा ते बारा वर्ष सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले यासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांच्यासह दौंड वकील संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व पुढाकार घेणाऱ्या सर्वच व्यक्तींचे आभार मानले.
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश कालिदास नांदेडकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट प्रणव भोईटे व अक्षी जैन यांनी केले.