लातूर जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणाचे दौंडला पडसाद….. खाटीक समाजाच्या वतीने शहरात आक्रोश मोर्चा
दौंड (टीम – बातमीपत्र)
लातूर जिल्ह्यातील वलांडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे . माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा दौंड मधील खाटीक समाजाने तीव्र निषेध नोंदवित शहरात आक्रोश मोर्चा काढला. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या वतीने याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले, दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे वलांडी येथील मागासवर्गीय अनुसूचित जातीतील, हिंदू खाटीक कुटुंबातील सहा वर्षे वयाच्या मुलीवर नराधमाने अत्याचार केला आहे. आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 4,6 तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु सदरचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवुन नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी,पीडित कुटुंबात आजाराने ग्रस्त वयोवृद्ध सासू-सासरे, एक विधवा महिला व त्यांच्या चार लहान मुली व एक लहान मुलगा असा परिवार असून सदरचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते त्यामुळे शासनाने पिडीत कुटुंबास आर्थिक मदत करावी,पीडित व आरोपीचे घर समोरासमोर असल्याने या कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे,पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा. अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या छोट्या खानी सभेमध्ये निखिल स्वामी ,आनंद पळसे, आकाश पलंगे तसेच दीपक कांबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व या प्रकरणातील नराधम आरोपीस कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी केली. यावेळी किरण खडके, सागर कांबळे, साईनाथ इंगोले, पद्माकर ताडे, भोजराज जमदाडे, कुणाल घोलप, उमेश जगदाळे, अविनाश गाटे, अमित कदम तसेच समाज बांधव उपस्थित होते.