दौंड परिसरात धारदार तलवार बाळगून दहशत करणाऱ्यास तलवारीसह अटक………
दौंड (टीम – बातमीपत्र)
धारदार तलवार आपल्या ताब्यात बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतला आहे.गुरूदास निवृत्ती राऊत (रा.राघोबानगर, गिरीम , ता. दौंड, जि. पुणे) असे या इसमाचे नाव असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , दि.४ रोजी दौंड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गिरीम येथे नामे गुरूदास राऊत हा आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दौंड परिसरात दहशत निर्माण करत आहे ही बातमी मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदारांना पाठवून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेली धारदार तलवारही ताब्यात घेतली आहे.त्यास ताब्यात घेत दौंड पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला आहे. उघडपणे धारदार तलवार बाळगुण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळले तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार महेश भोसले हे करत आहेत.