पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

वनविभागाच्या झाडांना लागली वाळवी ,झाडे जळण्याच्या मार्गावर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी……

राहू (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या हजारो झाडांना वाळवी लागल्यामुळे व पाणी देण्यात येत नसल्यामुळे झाडे जळू लागलीआहेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे दौंड तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची परिस्थिती आहे.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून पिंपळगाव येथील फिरंगाई माता परिसरातील वनविभागाच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाच्यावतीने कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. तत्कालीन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पिंपळगावच्या स्थानिक ग्रामस्थांनी या वनविभागाच्या क्षेत्रामध्ये हजारो देशी झाडांची लागवड केली. त्या झाडांची योग्य जोपासना केल्यामुळे या परिसरात घनदाट जंगल निर्माण झाले होते.
मात्र सध्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभागातील झाडांचे संगोपन करण्यापेक्षा स्वहितावर भर दिल्यामुळे त्यांच्याकडून वनसंगोपन होताना दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून या निसर्ग पर्यटन केंद्रातील हजारो झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. येथील अनेक झाडांना वाळवी लागली असून अनेक झाडे ही पाण्याअभावी जळून चालली आहेत.
त्यामुळे पिंपळगाव ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्याबाबत शंका उपस्थित केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

एकीकडे शासन वृक्ष लागवड करत असताना वृक्ष संवर्धनासाठी देखील प्रयत्न करा असे सांगत असते मात्र वनविभाग व पिंपळगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने येथे घनदाट जंगल तयार झाले होते मात्र वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे वाळवी या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने व झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडे जळू लागली आहेत. या गंभीर बाबीकडेने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये दोष असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी —– सुनील पासलकर (पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)

 

पिंपळगाव येथील निसर्ग पर्यटन केंद्रात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचा वृक्षसंवर्धनाचा कालावधी हा पाच वर्षाचा होता. सध्या संबंधित कालावधी पूर्ण झाला आहे. पाणी देण्यासाठी व संवर्धनासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
—- कल्याणी गोडसे ( वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड )

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!