महिला-विद्यार्थिनींनो त्रासाबाबत न घाबरता बिनधास्त तक्रार द्या — पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
कटारिया महाविद्यालयात 'कायद्याचे धडे'
दौंड (टीम – बातमीपत्र)
‘तुम्हाला जर कुणाकडून मानसिक, शारीरिक त्रास होत असेल तर न घाबरता बिनधास्त पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्रास देणाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करू आणि तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल.तुम्हाला सुरक्षित व निर्भय ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यतत्पर आहोत’ असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील भीमथडी शिक्षण संस्थेचे,स्व.किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘कायदा व सुव्यवस्था व सबलीकरण’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
मुली महिलांना त्रास होऊ नये, त्यांना असुरक्षित वाटू नये, त्यांना चांगले जिवन जगता यावे, यासाठी पोलीस निरीक्षक हे ज्या पोलीस ठाण्यात काम करतात तेथील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मुलींना कायद्याचे धडे देतात,त्यांना निर्भय बनवतात. त्यामुळे त्रास सहन करणाऱ्या असंख्य विद्यार्थिनी थेट यादव यांना आपल्या तक्रारी सांगतात.यामुळे कित्येक महिला-मुली निर्भयपणे जिवन जगत आहेत. यावेळी चंद्रशेखर यादव पुढे म्हणाले,’सोशल मीडियावर अनेक फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत.सायबर क्राईमला बळी पडू नका. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध रहा, जर असे प्रसंग आढळून आले तर तात्काळ कळवा. महाविद्यालयीन युवतींनी महाविद्यालयीन परिसरामध्ये व घरापासून महाविद्यालयापर्यंत येताना कुणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर येऊन तक्रार करा. यावेळी मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी विविध कलमे व दंड संहितेची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य डॉ.सुभाष समुद्र, जोतीप्रसाद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रमोद काकडे, गीताबाई बंब इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री पाटील, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्याचे पांडुरंग थोरात व महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे यांनी परिश्रम घेतले.