मराठी भाषा संवर्धनाचं काम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बापू काळभोर यांच्या सारखे लेखक करतात – वैद्यकीय सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे
लोणी काळभोर (टीम – बातमीपत्र)
संस्कृती कशी टिकू शकते असा प्रश्न सध्या विचारला जातो. मराठी भाषा लिहिली, बोलली तरच टिकू शकते. मराठी भाषा संवर्धनाचं काम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बापू काळभोर यांच्या सारखे लेखक करत आहेत. म्हणूनच त्यांचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये समाजातील युवकांनी घेतला पाहिजे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्याधिकारी व वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापु) काळभोर यांनी लिहिलेल्या “बापु’ज डायरी” आठवणीतल्या चार गोष्टी, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थेऊर फाटा येथील हॉटेल एस फोर जी या ठिकाणी शनिवारी (ता. १६) सायंकाळी पार पडला. यावेळी मंगेश चिवटे बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी एल स्वामी, प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष तथा पुणे प्राईम न्युजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, आरोग्यदूत युवराज काकडे व राजकीय, सामाजिक, शौक्षणिक, सहकार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले, प्रत्येक जण मनानं कधी ना कधी तुटलेला असतो पण कुठलाही रंगीत खडू जेव्हा तुटलेला असतो, मात्र त्या खडूंचा रंग देखील तसाच असतो. “बापु’ज डायरी” या पुस्तकातील आत्महत्यांच्या विषयीचा लेख वाचला तर ज्याच्या कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आलेला आहे. तो नक्कीच आत्महत्येपासून परावृत्त होईल. एवढ्या ताकदीचा हा लेख बाप्पुंनी लिहिला आहे.
तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलं आहे. त्याची सुरुवात शाळकरी वयामध्ये होते. मुलं एनर्जी ड्रिंक पितात आणि मग हळूहळू व्यसनाधीनतेकडे जातात. एका जागतिक अहवालानुसार सन २०५० पर्यंत जगातल्या एकुण लोकसंख्येपैकी ५०% म्हणजे निम्म्या लोकांना कॅन्सर होईल. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे असे आवाहन चिवटे यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना बी एल स्वामी म्हणाले की, राजकारणाच्या आखाड्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी हरवले आहेत. त्याचा विचार करून बापू’ज डायरी मध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने मांडली आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे विचार हे बापू काळभोर यांचे आहेत की मोठ्या बापूंचे आहेत असा प्रश्न पडतो. “बापु’ज डायरी”तील बरेच विषय शालेय पाठ्यपुस्तकात येण्यासारखे आहेत.
बातमीच्या पलीकडे काही विषय असतात ते आपण वर्तमानपत्रात लिहू शकत नाही. असे विषय बापूंनी पुस्तकात हाताळले आहेत. बापू दिसायला एकदम मावळ्यांच्या काळातील राहणीमान असलेले व्यक्तीमत्त्व असून त्यांचा स्वभाव फार मृदू आणि संवेदनशील आहे. कारण संवेदनशील विषयांवर सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या मराठीत पुस्तक लिहिणं हि साधी गोष्ट नाही. या पुस्तकात वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत, ते अत्यावश्यक आहेत. असेही स्वामी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले की पत्रकारितेच्या पलीकडे सुद्धा दुसरे जग आहे आणि त्याची जाणीव झाल्यानंतर बापूंनी अनेक विषयांवर लिहायला सुरुवात केली. त्यांनी सामाजिक विषयांवर खूप चांगल्या पद्धतीने थोडक्यात छोटे छोटे लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखणीतून त्यांची संवेदनशीलता व तळमळ दिसून येते. “बापु’ज डायरी” या पुस्तकामध्ये बाप्पुंनी केवळ समाजातील गंभीर विषय मांडले नाहीत. तर त्यावर उपायसुद्धा सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या संवेदनशील पत्रकार, लेखकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल जगताप यांनी व सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अमोल अडागळे यांनी मानले.