बारामतीत “वंचित”चा “किंचित”सा दिलासा ; सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्याने मतांची गोळाबेरीज फिरणार
दौंड (टीम – बातमीपत्र)
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढत असली तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे .
वंचित बहुजन आघाडीने गेल्यावर्षी ठाकरे गटाबरोबर युती जाहीर केली. त्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, इतर घटकपक्षातील मतभेदामुळे ठाकरे गटाबरोबर त्यांचं फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून माघार घेतली. परिणामी आता महाराष्ट्रात तिहेरी लढत होत आहे.
बारामती लोकसभा मतदासंघांत वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने आत्ता कोणाचे गणित बिघडणार? असा प्रश्न विचारला जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तब्बल ४६ हजार मते घेतली होती. सध्या बारामती लोकसभा मतदासंघांत
खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काटे की टक्कर असा सामना सुरू आहे. त्यातच हा वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्याने सुळे यांचे बेरजेचे गणित झाले असले तरी आगमी काळात अनेक उलथापालथी होणार आहेत.
ओबीसी बहुजन पार्टी यांनी महेश भागवत यांना उमेदवारी जाहीर केली असुन त्यांचा मेळावा नुकतीच चौफुला (ता.दौंड) येथे पार पडला . या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी सामील झाले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने आत्ता सुळे ना पाठिंबा दिल्याने ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराचे गणित बिघडणार का? हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.