राजकीयराज्य

काँग्रेसला निर्वाणीचा इशारा.. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय – खासदार संजय राऊत

मुंबई (टीम बातमीपत्र) – “काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. हिंदकेसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, त्या उंचीवर राहा. सांगलीतले आम्ही बघून घेऊ”, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

सांगली लोकसभेसाठी शिवसेना उबाठा गटाने काँग्रेसचा विरोध मोडून उमेदवार जाहीर केला. त्यानंतर आता संजय राऊत प्रचारासाठी उतरले आहेत. प्रचारापासून लांब राहणाऱ्या काँग्रेसला त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागावाटपावरून धुसफुस सुरू आहे. विशेष करून सांगलीच्या जागेवर शिवसेना उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यावरुन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाताने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे आज सांगलीच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. यावेळी सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.

काय म्हणाले संजय राऊत?
पत्रकारांना माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “संपूर्ण देशात एक चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. सांगलीची जागा हा काँग्रेससाठी वादाचा विषय होऊ शकत नाही. सांगलीची जागा महाविकास आघाडीची आहे. तसेच महाराष्ट्रातील ४८ जागा कोण्या एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत. महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. याचा फायदा काँग्रेसलाच केंद्रात होऊ शकतो. सांगलीची लढाई सुद्धा काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी आहे. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे.”

इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे. मग अशा परिस्थितीत रुसवे फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगली बाबत नाराजी असण्याचे काही नाही, असेही संजय राऊत म्हणाले. सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघाचे विषय आता संपले आहेत. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून प्रचारही सुरू केला आहे. आम्हीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार करणार आहोत. तसे काँग्रेसने आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!