मराठमोळी ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकेत! ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याबरोबर साकारणार भूमिका, म्हणाली…
ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकेत, कोण साकारणार मुख्य भूमिका, जाणून घ्या...
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या हिंदी मनोरंजन विश्व गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके, अभिज्ञा भावे या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वात झळकणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला ओळखलं जातं. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आता लवकरच हिंदी मालिकांमध्ये झळकणार आहे.
‘नांदा सौख्य भरे’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यांसारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे बऱ्याच काळाने मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. पण, यावेळी ऋतुजा मराठी नव्हे तर हिंदी मालिकेत झळकणार आहे. अभिनेत्री लवकरच ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’वरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या नव्या कोऱ्या मालिकेत ऋतुजा ‘वैजू’ हे पात्र साकारेल. याचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऋतुजा बागवेची प्रतिक्रिया
‘माटी से बंधी डोर’ या लोकप्रिय मालिकेत ऋतुजाबरोबर हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीचा अभिनेता व ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच्या पात्राचं नाव ‘रणविजय’ असं असेल. या नव्या मालिकेविषयी अभिनेत्री सांगते, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमे करताना मला मालिकेत काम करायला पाहिजे असं नेहमी वाटायचं. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज झालेली आहे. मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असतं. मालिकाविश्व बाहेरुन सोपं वाटत असलं तरी, ते आम्हा कलाकारांसाठी खूपच आव्हानात्मक असतं. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायल्या हव्यात. हे विचार सुरु असतानाच या मालिकेबद्दल विचारणा झाली.”
दिग्दर्शक, कथा आणि भूमिका या सगळ्याचा विचार करून मी ही मालिका स्वीकारली असं ऋतुजा बागवेने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दरम्यान, ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुडे करत आहेत. ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक असणार आहे. ऋतुजाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.