काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका मानसोपचार तज्ज्ञांची एक पोस्ट चर्चेत आली होती. त्यांनी एक्स (X) या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्याकडे आलेल्या एका रुग्णाविषयी सांगितले होते. पोस्टमध्ये ते सांगतात की, त्यांच्याकडे आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला सिनेअभिनेत्यांचा भास होतो; विशेषत: करीना कपूर दिसते. एवढेच काय तर जेव्हा हा तरुण या मानसोपचार तज्ज्ञांकडे आला तेव्हा करीना कपूर त्याच्यासमोर बसलेली त्याला दिसत होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा नेमका काय प्रकार आहे? एखाद्या व्यक्तीचा भास होणे म्हणजे खरेच ती व्यक्ती दिसते का? याचा संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे का? याविषयी लोकसत्ताने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
भास होणे म्हणजे नेमका काय प्रकार आहे?
डॉ. रश्मी जोशी : एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यांसमोर हातवारे करते, इशारे करते, तुमच्याशी बोलते किंवा ती इतर कुणाशी तरी बोलतेय. पण, प्रत्यक्षात फक्त तुम्हालाच ती व्यक्ती दिसते; इतर कोणालाही ती दिसत नाही. याच गोष्टीला आपण ‘भास’ म्हणतो.
भास वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात का?
आवाज ऐकू येणे – या प्रकारामध्ये तुमच्या कानामध्ये सतत आवाज ऐकू येतो. तुमचा स्वत:चा आवाज स्वत:ला ऐकू येतोय किंवा दुसरी व्यक्ती तुमच्याशी बोलते. काही भास कधी कधी सूचना देणारे असतात. “तू स्वत:ला मारून टाक, तू काही कामाचा नाही”, असेसुद्धा आवाज कानामध्ये ऐकू येऊ शकतात. अशा वेळी रुग्णाकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्याला पाच इंद्रिये आहेत. कोणत्याही इंद्रियाला धरून आपल्याला भास होऊ शकतात.
कॉमेंट्री – दोन व्यक्तींचे एकमेकांशी बोलणे ऐकू येणे यालाच कॉमेंट्री भास म्हणतात. त्याशिवाय या प्रकारामध्ये दंगलीचे आवाज ऐकू येणे, असे भाससुद्धा होऊ शकतात.
एखादी व्यक्ती दिसणे – या प्रकारामध्ये तुम्ही एखाद्याला खरोखर बघू शकता. तुम्हाला एखादी व्यक्ती दिसू शकते किंवा देव दिसू शकतो आणि त्याचे वर्णन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करता. उदा. त्या व्यक्तीची साडी कशी आहे, तिने मोठा टिळा लावला आहे. तिचे केस मोकळे आहेत, ती काळ्या कपड्यांमध्ये आहे, ती भूत आहे. तुम्हाला व्यक्ती दिसू शकतात आणि त्या तुमच्याशी बोलतायत, असा तुम्हाला भास होतो.
त्वचेवर हालचाली – जेव्हा त्वचेवर काहीतरी चालत आहे किंवा हालचाल होत आहे, असे वाटते; त्याला ‘टॅक्टाइल’ भास, असे म्हणतात. अशा प्रकारचा भास जास्तीत जास्त कोकेनचे सेवन करणाऱ्यांना व्यक्तींना होत असल्याचे दिसून येते.
सारखा वास येणे – एखाद्या व्यक्तीला आजूबाजूला सर्व काही स्वच्छ असताना सारखा काही सडले असल्याचा वास येतो. तर, हासुद्धा एक भासाचा प्रकार आहे.
तरुणाला करीना कपूरच का दिसतेय?
डॉ. रश्मी जोशी : नेता असो, अभिनेता-अभिनेत्री, गावच्या व्यक्ती, आजी-आजोबा कोणाचाही तुम्हाला भास होऊ शकतो. माझ्याकडे आलेल्या एका रुग्णाला त्याच्या गावाकडचे आवाज यायचे. कोणतीही गोष्ट तुम्हाला घेरू शकते. त्याला कारण नाही. त्यामध्ये अचानक आलेला एखादा विचारही असतो. जर मी रुग्णाला विचारले की, तुम्हाला कोणाचा आवाज येतोय, तो म्हणेल बाईचा. त्यावर मी पुन्हा त्याला विचारले कोण आहे ती बाई? त्यावर तो म्हणू शकतो की, अनोळखी बाई आहे. मी तिला ओळखत नाही. त्यामुळे करीना कपूरच का दिसतेय यामागे कारण नाही.
Post Views: 69