लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २४ मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले असून आता उरलेल्या २४ मतदारसंघात पुढील दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघात प्रचार करण्यावर आता सर्वच राजकीय पक्षांचा जोर दिसत आहे. दरम्यान तीन टप्प्याच्या मतदानानंतर आता प्रचारात नवीन मुद्दे येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करत असताना अदाणी-अंबानी यांचा उल्लेख केला. दोन्ही उद्योगपतींनी टेम्पो भरून काळा पैसा काँग्रेसला दिला, असा आरोप केल्यामुळे चौथ्या टप्प्याआधी आता अदाणी-अंबानी यांचा प्रचारात उल्लेख झाला आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलत असताना मविआला ३० ते ३५ जागा मिळतील, असे विधान केले आहे. या विधानावर बोलत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर एकतर उद्धव ठाकरे यांना पवारांच्या पक्षात विलीन व्हावे लागेल आणि शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची तुतारी वाजणार नाही, त्यांती तुतारी बंद होणार असल्यामुळे त्यांना विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही.