निवडणुकीमुळे वाहन विक्रीला फटका!
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त यंदा नागरिकांचा वाहन खरेदीकडे कमी कल दिसून आला.
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त यंदा नागरिकांचा वाहन खरेदीकडे कमी कल दिसून आला. पुण्यात यंदा ६ हजार ५६४ वाहनांची खरेदी झाली असून त्यात दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत सुमारे २५ टक्क्यांची घट झाली आहे. निवडणुकीमुळे वाहन विक्रीला फटका बसल्याचे वितरक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे म्हणणे आहे
यंदा अक्षय्य तृतीयेच्या आधीच्या नऊ दिवसांत ६ हजार ५९४ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या आधीच्या नऊ दिवसांत ८ हजार ६२० वाहन विक्री झाली होती. यंदा विक्रीत सुमारे २ हजारांनी घट झाली आहे. यंदाही विक्री झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक असून, ४ हजार २७० दुचाकींची विक्री झाली. त्याखालोखाल १ हजार ३७१ मोटारींची विक्री झाली. तसेच, मालवाहतूक वाहने २०५, रिक्षा १४२, बस १९, टॅक्सी १२७ आणि इतर वाहने ७० अशी विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालवाहतूक वाहने, रिक्षा, बस, टॅक्सी यांची विक्री निम्म्याने घटली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्री निम्म्याने कमी झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या आधीच्या नऊ दिवसांत ३९० ई-वाहनांची विक्री झाली. ई-वाहनांध्ये सर्वाधिक ३५८ दुचाकींची विक्री झाली. त्याखालोखाल ३१ ई-मोटारींची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ई-दुचाकींची विक्री निम्म्याने कमी झाली आहे. तसेच इतर ई-वाहनांमध्ये केवळ एका रिक्षाची विक्री झाली असून, मालवाहतूक वाहने, बस, टॅक्सी आणि इतर वाहनांची विक्री झालेली नाही.
निवडणुकीचा कालावधी असल्याने वाहन विक्रीवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. निवडणुकीमुळे अनेक जण बाहेरगावी जात असल्याने त्यांच्याकडून वाहन खरेदी लांबणीवर टाकली जाते. त्यामुळे विक्री कमी झालेली दिसते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले
गेल्या वर्षीपेक्षा यंदा अक्षय्य तृतीयेला वाहनांना मागणी कमी दिसून आली. स्थलांतरित वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्यात असून, तो निवडणुकीमुळे मूळ गावी गेला आहे. त्यांच्याकडून खरेदी कमी झाल्याने यंदा विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे अशी माहिती कोठारी व्हील्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूपेश कोठारी यांनी दिली.