४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!
पडलेला महाकाय फलक हटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे फलक कापण्यावर मर्यादा येत होत्या.
वादळी वाऱ्यामुले घाटकोपर द्रुतगती महामार्गावरील महाकाय फलक पडल्याने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा महाकाय फलक हटवण्याचे कार्य गेल्या ४० तासांहून अधिक काळापासून युद्धपातळीवर सुरू असून याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांनी यासंदर्भात आज माध्यमांना माहिती दिली.
पडलेला महाकाय फलक हटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे फलक कापण्यावर मर्यादा येत होत्या. तसंच, भूमिगत इंधन टाकी असल्याने गॅस कटर वापरता येत नव्हता. तसंच, जाहिरात फलक पडल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंप चालकानेही पळ काढला. त्यामुळे या पेट्रोल पंपावर नक्की किती पेट्रोल आहे, भूमिगत टाकीत पेट्रोल आहे का याची माहिती तत्काळ मिळू शकली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने बीपीसीएलच्या मुख्य वितरकाला बोलावून ही माहिती घेतली. भूमिगत टाकीतील पेट्रोल निकामी करण्यात आले. त्यानंतर येथे गॅस कटर वापरण्यात आला.
“गॅस कटरचा वापर करून पहिला ग्लिडर कट झालेला आहे. आता दुसरा ग्लिडर कट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन- तीन चार गाड्या ग्लिडरच्या खाली अडकल्या आहेत. त्यामुळे त्या गाडीत कोणी अडकल्याची शक्यता आहे. आमची टीम एका कारपर्यंत पोहोचली. त्यात काहीजण अडकल्याची शक्यता आहे”, असं एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर म्हणाले.
रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असून तेथेच जाहिरात फलक उभारण्यात आला होता. हा फलक अनधिकृत असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर फलक उभारणाऱ्या भावेश भिंडे याच्यासह अन्य काही जणांविरूद्ध पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ ७ च्या पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. मंगळवारी एनडीआरएफ, अग्निशमन आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू होते. फलक बाजूला करण्यासाठी रात्रीच मोठ्या क्रेन आणण्यात आल्या होत्या.
मृतांची नावे
१) भरत वसंत राठोड – २५ २) चंद्रमणी खारपालू प्रजापती – ४५ ३) दिनेशकुमार जैस्वाल – ४४ ४) मोहम्मद अक्रम – ४८ ५) बसीर अहमद अली हनीफ शेख – ६० ६) दिलीप कुमार पासवान – ३० ७) पुर्णेश बाळकृष्ण जाधव – ५० ८) सतीश बहादुर सिंग – ५१ ९) फहीम खलील खान – २० १०) सूरज महेश चव्हाण – १९ ११) धनेश मास्टर चव्हाण – ४८ १२) हंसनाथ रामजी गुप्ता – ६८ १३) सचिन राकेश कुमार यादव – २३ १४) राजकुमार दास-२०