मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करा
पुणे (टीम – बातमीपत्र)
सर्व मतदान केंद्रावर आज आणि उद्या निवडणूक अधिकारी प्रारूप मतदार यादी घेऊन बसणार आहेत; मतदारांनी आपली नावे या यादीत आहेत किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्याकरीता जिल्ह्यात आज आणि उद्या रविवार, ११ ऑगस्ट तसेच शनिवार, १७ ऑगस्ट व रविवार,१८ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे याबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी. यादीत आपले नाव नसल्यास किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येईल. दावे व हरकती सादर करताना वोटर हेल्पलाईन ॲप किंवा
https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा.
जिल्ह्यात मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही मोहिमस्तरावर सुरू असून यामध्ये मयतांचे नातेवाईक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घेवून सहकार्य करण्याचे आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले.