बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने नाणोली परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन
पुणे, (BS24NEWS):- बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि प्रेम ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने तळेगाव महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ परिसरातील नाणोली येथील हिंदकेसरी बैलगाडा घाटात आयोजित बैलगाडा शर्यतीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जि. प. पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाते, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा मालक, चालक, शेतकरी उपस्थित होते.
श्री. केदार म्हणाले, येत्या दिवसात बैलगाडा शर्यतीचे चोखपणे आयोजन व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी यापुढेही उभे राहू. भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषिप्रधान देशात शेतकरी जनावराची सेवा करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. शेतकरी एक वेळ आपल्या पोटाचा विचार करणार नाही मात्र आपले पशुधन उपाशी राहणार नाही याची काळजी घेतो. बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था असते, असेही श्री. केदार म्हणाले.यावेळी खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनीदेखील बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उत्तमरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचा सन्मान करण्यात आला.