औरंगाबाद (BS24NEWS) : महसूल विभागाने गौण खनिज व वाळू उपसाबाबतची महसूल वसूलीचे विभागाचे उदिष्टयपूर्ती मधून शासनाच्या महसूलात वाढ करावी, तसेच ग्रामविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेचे राज्यस्तरीय उदिष्टयपूर्ती कार्यक्रम यशस्वी करण्याबरोबरच रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम देऊन रोजगाराबरोबरोच विकास काम पूर्ण करावीत. अशा सूचना राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यस्तरीय दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित विभागनिहाय आढावा बैठकीत दिल्या.
या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील महसुल उप-आयुक्त पराग सोमण, विकास नियोजनचे उप-आयुक्त अनिलकुमार नवाळे, रोहोयो उप-आयुक्त समीक्षा चंद्राकार, सहायक आयुक्त श्रीमती विना सुपेकर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, रोहोयो उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संगीता पाटील या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत प्रथम औरंगाबाद विभागातील महसूल व ग्रामविकास विभागच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यात आली. यात राज्यमंत्री यांनी महसूल वसूलीचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच विभागात घरकुलाचा लाभ बेघर आणि गरिब नागरिकांना लवकरात लवकर मिळावा. यासाठी जिल्हाधिकारी व संबधित यंत्रणेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्रुटीचा निपटारा करीत गरिबांना लाभ मिळवून द्यावा. तसेच वर्षनिहाय झालेल्या उदिष्टाचा आढावा घेत असतानाच काही जाचक अटी शिथिल करता येतील का याबाबत जिल्हास्तरीय समित्यांनी कार्य करावे. यातून ग्रामविकासात लोकांच्या अडचणी जाणून घेऊन तालुका गाव स्तरावर प्रत्यक्ष अधिकारी यांनी भेटी देण्याचे निर्देश यावेळी सत्तार यांनी दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंच्या लाभासाठी नागरिकांकडून प्रपत्र चार भरुन घेण्याबाबतची कार्यवाही गावपातळीवर पारदर्शक करावी. तसेच ग्रामीण भागात विकासकाम करण्यावर भर द्यावा. महसूल व ग्रामविकास विभागाने कामकाजात अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी व गरिब, बेघर यांनी घर आणि रोजगार हमीतून हाताला काम उपलब्ध करुन विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत मंत्री सत्तार यांनी दिले.