महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम – मंत्री नवाब मलिक
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाचा उपक्रम, महिला दिनापासून विशेष प्रशिक्षण; अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई (BS24NEWS) : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या 120 महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी २०२२ असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण ८ मार्च २०२२ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होईल. प्रशिक्षणामध्ये उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात येईल, असे श्री. मलिक यांनी सांगितले.
“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” या नावाने हा उपक्रम राबविण्यात येत असून यातून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम उद्योगात रूपांतर करता येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे.
१ मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा-कार्यशाळा सुरू करा – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. 4 जानेवारी 2021 रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पात्र महिला उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करावेत, असे आवाहन असे श्री. मलिक यांनी केले आहे.