दौंड तालुक्यातील लांडग्याला कॅनाईन डीस्टेंपर विषाणूची बाधा
दौंड (BS24NEWS) दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा या ठिकाणच्या लांडग्याला कॅनाईन डीस्टेंपर विषाणूची बाधा होऊन त्याचा मृत्यु झाला असल्याची माहित दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली.
दि.१४ फेब्रुवारीला हिंगणीगाडा (ता. दौंड) या ठिकाणी एक लांडगा आजारी अवस्थेत आढळुन आला. या लांडग्यास पशुवैदयकीय अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी रेस्क्यु चारिटेबल ट्रस्ट बावधन पुणे यांच्या पथकासोबत पुढील उपचारासाठी पुणे येथे नेले परंतु हा लांडगा उपचार चालू असताना मृत झाला . मृत्यूनंतर या लांडग्याचे शवविच्छेदन केले असता या प्राण्यामध्ये कॅनाईन डिस्टेंपर हा विषाणु असलेचे निष्पन्न झाले.
तालुक्यात अनेक दिवसांपासून लांडगे मृत पडत असल्याच्या घटना घडल्या आहेत . दि. 11 डिसेंबरला खामगाव ( ता. दौंड) येथील खाजगी उसाच्या क्षेत्रांमध्ये एक वर्षे वयाचा कोल्हा मृतावस्थेत आढळून आला परंतु त्याचे शरीर कुजलेले असल्याने त्याचे शवविच्छेदन करता आले नाही. दि. 12 डिसेंबरला हिंगणीगाडा (ता. दौंड) व दंडवाडीच्या शिवेवर एक लांडगा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचेही मृत्यूचे कारण समजू शकले नाही . दि. 27 डिसेंबरला खोर (ता.दौंड) येथील वनक्षेत्रामध्ये एक लांडगा मृतावस्थेत आढळला त्याचे राहू येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले त्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्या लांडग्याचा मृत्यू आतड्याला पीळ पडल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले . नुकतेच दि. 18 फेब्रुवारी रोजी हिंगणीगाडा ( ता.दौंड) येथील वनक्षेत्र मधील गुहेमध्ये एक मोठा लांडगा व पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले परंतु त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व गोळे मध्ये असल्याने शवविच्छेदन करता आले नाही.
दरम्यान याबाबत दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे म्हणाल्या की , कॅनाईन डिस्टेंपर या विषाणूचा प्रादुर्भाव इतर वन्य प्राणी व पाळीव प्राण्यांमध्ये होऊ नये म्हणून वन क्षेत्रांमधील भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वनकर्मचारी तसेच गावकर्यांना कॅनाईन डिस्टेंपर या रोगाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती देऊन पाळीव प्राण्यांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याचे विलगीकरण करण्यास सांगण्यात येणार आहे.