मित्रांच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली मात्र मित्रांचा वाटा कुठे आहे ? — प्रा. जोगेंद्र कवाडे
दौंड (BS24NEWS) महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना मित्र पक्षांचा विसर पडला असून याचा राग नाही मात्र दुःख जरूर झाले असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. ते दौंड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे , संजय सोनवणे, अमित सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.कवाडे पुढे म्हणाले की , आमचा पक्ष 1988 पासून काँग्रेसच्या आघाडीत आहे. राज्यात मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे . सत्तेत आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मित्र पक्षांचा विसर पडला आहे. जे पक्ष सत्तेत नाहीत मात्र मित्रपक्ष आहेत अशा पक्षांची मिळून एक समन्वय समिती तयार करावी ही आमची मागणी होती याचेही सौजन्य मागील अडीच वर्षात दाखविले गेले नाही याचे दुःख आहे. महविकास आघाडीने सत्तेत मित्रपक्षांना वाटा दिला असता तर काय बिघडले असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील , काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या याद्या मागवुन घेतल्या मात्र काहीच दिले गेले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या आगोदर आघाडीसाठी चर्चेचं आमंत्रण दिले जाते मात्र अद्यापपर्यंत चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढविणार आहोत. तसेच ह्या निवडणूक लढवीत असताना आम्ही नवीन राजकीय मित्राच्या शोधात सुद्धा आमचा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले असून अनेक प्रस्ताव आले आहेत मात्र सन्मानजनक प्रस्ताव ज्यांचा येईल त्यांच्याबरोबर आम्ही जाण्याचा निर्णय घेऊ असे हि त्यांनी सांगितले.
दलित आणि बौद्धांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये युतिच्या काळापेक्षा आघाडीच्या सरकारमध्ये 23 टक्के वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजप हा राजकीय पक्षा ऐवजी धार्मिक पक्ष आहे अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास आहेत असा संदर्भ जोडला आहे मात्र तसा उल्लेख इतिहासात आम्ही कधी बघितला नाही . त्यामुळे राज्यपाल हे अशोभनीय वक्तव्य करीत आहेत केंद्र सरकारने याची दखल घेऊन असंवैधानिक पद्धतीने वागण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात असेही त्यांनी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार जेरीस आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असून इडी, आयटी यांचा बागुलबुवा उभा करून महाविकास आघाडी भयभीत करण्याचा प्रयत्न ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.