आजपासून बारावीची परीक्षा सूरू
दौंड तालुक्यात ४३९१ विद्यार्थी देणार इंग्रजीचा पेपर..
कुरकुंभ (BS24NEWS)
कोरोनामुळे मागील वर्षी बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता,यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यालय सुरू झाले असल्याने या वर्षीची बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. राज्यात बारावीच्या परीक्षेला आज (दि.४) शुक्रवार रोजी इंग्रजीच्या पेपर ने सुरवात होणार असून सात एप्रिल पर्यंत बारावीची परीक्षा चालणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे.यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढीव दिला आहे. दौंड तालुक्यामध्ये तब्बल ४३९१ विद्यार्थी परीक्षा देणार असून तालुक्यात ८ मुख्य केंद्र आणि ३० उपकेंद्रावर ही बारावीच्या परीक्षेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यात प्रभारी गटविकास अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली परीरक्षक म्हणून दिलीप वणवे,तर सहाय्यक परीरक्षक म्हणून विश्वनाथ शिंदे हे काम पाहत असून सर्व केंद्रावर यंत्रणा सज्ज झाली आहे.एका वर्गात फक्त पंचवीस विद्यार्थी अशा प्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.कुरकुंभ मधील श्री फिरंगाईमाता माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीसाठी १५२ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी दिली.