विधानसभेत प्रश्न उपस्थित होताच वाळूमाफियांवर कारवाई
एकही वाळूमाफिया हाती लागला नाही
दौंड(BS24NEWS)
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत अवैध वाळू उपशाचा प्रश्न विचारता याबाबत जबाबदारी निश्चित करा अशी मागणी लावुन धरली होती.
यानंतर मात्र येथील महसूल व पोलीस प्रशासनाने दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रात दिवसा ढवळ्या धुडगूस घालणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारायला सूरवात केली आहे.
मागील कित्येक वर्ष येथील वाळू माफिया संघटितपणे महसूलच्या काळ्या सोन्यावर बिनदिक्कतपणे डल्ला मारत होते. परंतु येथील महसूल व पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा होता. माफियांवर ठोस कारवाई केली जात नव्हती. यावेळेस मात्र नाईलाजास्तव का होईना प्रशासनाने संयुक्तपणे वाळू माफियांवर कारवाई केली आहे .
दौंड शहरालगतच्या कचरा डेपो या ठिकाणच्या वाळू माफियांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या ठिकाणच्या कारवाईमध्ये एकूण 20 यांत्रिक बोटी उध्वस्त करण्यात आल्या आहेत. माञ नेहमीप्रमाणे एकही वाळूमाफिया महसूल व पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
तहसीलदार संजय पाटील,दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.