उशिरा आवर्तन आल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
पाटसच्या शेतकऱ्यांनी दौंड चे तहसीलदार यांना दिले लेखी निवेदन
पाटस (BS24NEWS)
खडकवासला धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन 15 दिवस उशिरा सोडण्यात आल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे . झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय पाटील यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
पाटस येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढील बाबी नमूद करण्यात आल्या आहेत . शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे . खडकवासला धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन हे 15 दिवस उशिरा सोडण्यात आले आहे . आवर्तन उशिरा सोडल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत . यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत .
कालवा सल्लागार समिती , सिंचन विभाग यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नसल्याने हे विभाग शेतीसाठी आवर्तने उशिरा सोडतात असा आरोप या निवेदनात शेतकऱ्यांनी केला आहे . तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे .
यावेळी सत्वशील शितोळे जयंत शितोळे पाटील , आबा शितोळे पाटील , रमेश जाधव , दिनेश गायकवाड , विष्णु गायकवाड , नवनाथ म्हस्के , संजय शिंदे , संदीप खारतुडे, यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .