यवत शिबिरात 415 जणांची आरोग्य तपासणी
राहू (BS24NEWS)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने दौंड तालुक्यातील यवत येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 415 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे , माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, माजी उपसभापती नितीन दोरगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष योगिनी दिवेकर, डॉ. वंदना मोहिते यवतचे सरपंच समीर दोरगे, डॉ सुभाष खिल्लारे आदी उपस्थित होते.
यावेळी रुग्णांसाठी डिजिटल हेल्थ आयडी, आयुष्मान भारत कार्ड, मोफत रक्त, लघवी, एक्स-रे,ईसीजी करण्यात आला.गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी रुग्णांना आयुर्वेद विभागाच्यावतीने आहार, योगा, प्राणायाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. नेत्रदान,अवयवदान, देहदान, यासंबंधी स्वयम् इच्छापत्र भरून घेण्यात आले. या आरोग्य मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.