धक्कादायक – राहूच प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे…
आरोग्य केंद्र चालवतात खाजगी डॉक्टर,..गलेलठ्ठ पगारावाले डॉक्टर वारंवार गैरहजर
राहू (BS24NEWS) – दौंड तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या राहू प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज नसताना किंवा वरिष्ठांची परवानगी नसताना खाजगी डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून घेण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार घडत असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राहूबेट परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
राहू बेट परिसरातील राहु, पिंपळगाव, वाळकी, कोरेगाव भिवर, टेळेवाडी, पानवली, वडगाव बांडे, टाकळी भिमा, पाटेठाण, देवकरवाडी, दहिटणे, पिलाणवाडी, मिरवडी आदी गावासाठी राहू प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे व विटभट्याचे प्रमाण असल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र वरदान आहे. दररोज येथे 150 ते 200 ओ.पी.डी होतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापसात समझोता करून प्रत्येकाने तीन दिवस- रात्र सेवा करायची असे अंतर्गत ठरवले.मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली संपते यांची शनिवार (दि.30) रोजी कामावर उपस्थित राहण्याची जबाबदारी होती. मात्र संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परस्पर एका खाजगी डॉक्टरची नेमणूक करून त्या निघून गेल्या.
सकाळ पासून येथे रुग्णांची गर्दी झाली होती. यावेळी गावातील एका नवख्या डॉक्टर कडून रुग्णाची तपासणी करण्यात येत असल्याचा प्रकार जागरूक नागरिकांच्या नजरेतून सुटला नाहि. याबाबत जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर डॉ. भगवान पवार यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर मात्र या खाजगी डॉक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रातून पोबारा केला.
राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खाजगी डॉक्टर उपचार करत असल्याची घटना गंभीर असून याबाबत चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल.
डॉ.भगवान पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी)प्राथमिक आरोग्य केंद्र राहू येथे घडत असलेला हा प्रकार निंदनीय असून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. रात्रीच्या वेळी एकच परिचारिका सेवा करत असून अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसतात. तसेच रविवारी देखील डॉक्टर उपलब्ध होणे अपेक्षित आहे.याबाबत योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी.
दिलीप देशमुख (सरपंच राहू)
………………………………………………….
रात्रीच्या वेळी कामचुकारपणा…
संबंधित महिला वैद्यकीय अधिकारी रात्रीच्यावेळी कामावर असल्यानंतर रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना त्यांच्याकडून सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून माहिती दिली असताना देखील त्यांच्याकडून या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच रविवारच्या दिवशी देखील दोन्ही वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर जात असून रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. याबाबत देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
……………………………………..
मेगा लसीकरणाकडे पाठ…
राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन दिवसापासून मेगा लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. याकडे स्थानिक पातळीवरील कर्मचाचारी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पाठ फिरवली जात आहे. शनिवारी मेगा लसीकरण कॅम्पला वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित नव्हते. केवळ परिचारिकांच्या जीवावर लसीकरण सुरू होते. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात अवघ्या साठ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.