मानवी आरोग्यासाठी विषमुक्त शेती काळाची गरज- माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर
राहु (BS24NEWS)
जगात आज अनेक उद्योगात स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु शेतीकडे वळताना अनेकांना भीती वाटते. आपला देश कृषिप्रधान आहे. या देशात अनेक संत व ऋषींनी शेतीत वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले. मात्र सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर ही डोकेदुखी असून मानवी आरोग्यासाठी विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज बनली असल्याचे मत राज्याचे माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील सजपुर येथील शेतकरी विकास म्हेत्रे यांनी नव्याने सुरू केलेल्या श्रेया नॅचरल गुळ या व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, सध्या उत्पन्न वाढवण्याच्या हव्यासापायी शेती मध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यात येत असल्यामुळे शेतीतील घटकांची मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात शेतजमिनी नापीक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. अनेक रासायनिक औषधांवर बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात त्याची फवारणी पिकावर केली जाते. त्यामुळे मानवी आरोग्य देखील धोक्यात आले असून विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे.
शेती हा उद्योग व्यवसाय असून शेतकऱ्यांनी स्वतः स्वतःचा ब्रँड तयार करून बाजारात विकला पाहिजे. विकास म्हेत्रे यांनी स्वतःच्या दहा एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसाचे गाळप स्वतः करून त्यापासून शंभर टक्के सेंद्रिय गूळ काकवी निर्मिती सुरू केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास यावेळी वाठारकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, सरपंच मीनाक्षी म्हेत्रे,भारती पाटील, दत्ता पाटील,चिंतामणी घोळे,दादा बोराटे,किरण शिंदे, सुरेश रणवरे,शाम हुंबर्डे,चांगदेव म्हेत्रे,तुकाराम म्हेत्रे श्रीनिवास करचे,आबा शिंदे, दीपक शिंदे, शरद कोळपे,रोहन इनामके,राजेंद्र कुदळे,दत्ता टिळेकर,दिनेश टिळेकर, विकास म्हेत्रे,रुपाली म्हेत्रे आदी सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.