वाफगाव च्या भुईकोट किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
राहु (BS24NEWS)
वाफगाव ता.खेड, जि. पुणे येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला असून होळकर राजघराण्याचा भव्य भुईकोट किल्ला येथे आहे.या किल्ल्यात सध्या रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू असून शाळेची पर्यायी व्यवस्था करून या भुईकोट किल्ल्यात श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारन्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी दिली.
होळकर राजकारणाचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या आग्रहास्तव माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज वाफगाव येथील होळकरांच्या भुईकोट किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली.
सन 1955 पासून या किल्ल्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू आहे. होळकर कुटुंबीयांनी तत्कालीन परिस्थितीत सदरचा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीसपत्र करून दिला होता. मात्र सध्या या किल्ल्याची दैयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा दुसरिकडे सुरू करून किल्ल्याचे संवर्धन करण्यात यावे अशा प्रकारची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, देशामध्ये होळकर कुटुंबियांचे बहुमूल्य योगदान असून महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासारखा महापराक्रमी राजे या कुटुंबात झाले. रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असणारा हा किल्ला होळकर कुटुंबांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येथे सुरू असणारी रयत शिक्षण संस्थेची शाळा गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने बांधून सुरू करण्यात येईल. या शाळेसाठी एक कोटी रुपये देण्यात येतील अशी ग्वाही यावेळी खासदार पवार यांनी दिली.
या प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिहराजे होळकर,आमदार दिलीप मोहिते, आमदार रोहित पवार, रयत शिक्षक संस्थेचे अनिल पाटील, पांडुरंग पवार, प्रवीण गायकवाड निर्मला पानसरे, पप्पूराजे होळकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
.