पाटस टोलच्या मुजोर व्यवस्थापकासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल…..
यवत(BS24NEWS)
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस(ता.दौंड) येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढीवारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी टोल प्लाझा कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर याच्यासह चार जणांवर यवत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटस टोल प्लाझा कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर, टोल वसुली कर्मचारी बालाजी वाघमोडे, टोल कंपनीचा अधिकारी सुनील थोरात व विकास दिवेकर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने दि. ७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख पालखी व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना टोल मध्ये सूट देण्याच्या आदेशाचे परिपत्रक काढले होते. तसे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. तसे आदेश ही शासनाने राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना परिपत्रकाद्वारे देण्यात आला होता.
मात्र तरीही पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वाहने अडवून त्यांच्याकडून टोल आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे उल्लंघन पाटस टोल प्लाझा कंपनीकडून करण्यात आल्याने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी फिर्याद दिल्याने पाटस टोल प्लाझा कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर अजय ठाकूर व इतर तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.