दौंडला आषाढी एकादशी उत्साहात ……..
दौंड (BS24NEWS)
समाधान चित्तांचे चरणा आलिंगन |पायांवरी मन स्थिरावले ||१||
जैंसे केंले तैंसे घालू लोटांगणा | करू प्रदक्षिणा नमस्कार ||२||
प्रार्थितो मी तुज राहें माझे पोटी | हृदय संपुटी देवराया ||३||
क्षेम आलिंगन दिधली पायी मिठी | घेतलीसे लुटी अमूप हो ||४||
तुका म्हणे आता आनंदी आनंद | गाऊ परमानंद मनासंगे ||५||
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वर्णनाप्रमाणे दौंड शहरात भक्तीचा परमानंद पहावयास मिळाला.भक्तिमय वातावरणात दौंडला आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या दौंडच्या प्राचीन विठ्ठल राही रुक्मिणीच्या मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती.शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे दौंड शहराच्या परिसरातील कुरकुंभ, शिर्सुफळ, गोपाळवाडी, मळद, जिरेगाव, गिरिम, मसनरवाडी, मेरगळवाडी, येडेवाडी, या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत पांडुरंगाच्या मंदिरात क्षेम आलिंगन देण्यास आल्या होत्या. शहरात ठीक ठिकाणी पालख्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथापरंपरेप्रमाणे दौंड गावचे पाटील वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे यांनी शहरात पालख्यांचे स्वागत केले. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी निर्मला रशिनकर यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालख्यांचे स्वागत केले.
या पालख्या वाजतगाजत भीमा नदी तीरी गेल्या तिथे ग्रामदेवतांच्या मुखवट्यांना स्नान घालण्यात आले. भीमातीरी ग्रामदेवतांच्या आरत्या झाल्या आरत्या झाल्यानंतर मानाप्रमाणे पालख्या विठ्ठल मंदिरात गेल्या तिथे प्रदक्षिणा झाल्यानंतर पालख्या आपल्या गावी रवाना झाल्या. पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पालख्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक मंडळे, पक्ष संघटना यांनी खिचडी , फळे,असेत वाटप केले यानंतर नगरपालिकेच्या सफाई कामगार विभागामार्फत पालख्या पुढे गेल्यानंतर लगेच साफसफाई करण्यात आली.
प्रति पंढरपूर असणाऱ्या शहरातील विठ्ठल राही रुक्मिणीच्या मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषकास सुरवात करण्यात आली. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. मंदीरात दर्शनासाठी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखिल मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.