राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आचारसंहिता हटविली
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निर्णय
केडगाव (BS24NEWS) राज्यातील ९२ नगरपरिषद व चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम ८ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता.
परंतु ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने, मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२ जुलै, २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि. १९ जुलै २०२२ रोजी ठेवलेली असल्याने निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. याशिवाय लागू झालेली आचारसंहिता हटविण्यात आली आहे.
राज्य शासनाने गुरुवारी नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असा निर्णय घेतला असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम ८ जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर दि. १९ रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ८ जुलै रोजीचा आदेश रद्द करण्यात आला असल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढले आहे.