आमदार कुल यांची दूरदृष्टी व सहकार्याच्या जोरावर आणि तरूणांचे अपार कष्ट…यामुळे अशक्य होते ते शक्य होत गेले…
पाटस(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील जिरायत पट्ट्यात असणारे रोटी हे गाव श्री श्रेत्र रोटमलनाथ देवस्थानमुळे अख्या महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रसिद्ध आहे. तसेच संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा याच गावातून जात असताना लागणारा अवघड घाट म्हणजे “रोटी घाट” यामुळे रोटी गाव हे सर्वत्र परिचित आहे, पण तेच रोटी (ता. दौंड)गाव दुष्काळी गाव म्हणून तेवढेच प्रसिद्ध आहे. स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या दूरदृष्टीने जिरायत भागास वरदान ठरणारी जानाई उपसा सिंचन योजना अंमलात आली. या माध्यमातून अनेक अडथळ्यांचा सामना करत अनेक तलावांना पाणी मिळाले. जिरायती शेती काही प्रमाणात बागायती झाली पण यांस मात्र रोटी व वासुंदे गावचा गावठाण तलाव अपवाद ठरला. परंतु रोटी येथील तरुणाईचे श्रमदान आमदार कुलांचे सहकार्य आणि तरुणाईने उत्कृष्ट केलेले नियोजन यामुळे आज रोटीच्या गावठाण तलावात अखेर पाणी पोहोचले आहे. त्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असुन याचा फायदा दरवर्षी येणाऱ्या संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला व रोटमलनाथ चरणी येणाऱ्या भाविकांना होणार आहे.
आपलं गाव कायम स्वरुपी दुष्काळी असल्याचा शिक्का पुसण्यासाठी व गावात शेतीसाठी गावाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी तरूण वर्गाने रोटमलनाथ मंदिरात पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. गावपुढार्यांना जागे करण्याचे काम केले, परंतु म्हणतात ना “गाव थोर पण पुढारी चोर ” येथेही असंच पहायला मिळाले. तरुणांना साथ देण्याऐवजी त्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न झाला. पण तरुणांनी जिद्द न सोडता पाणी आणण्याचेच ठरविले. पण कुठलेही काम करण्यासाठी कोणाचे तरी सहकार्य लागतेच म्हणुन या तरूणांनी दौंडचे आमदार राहूल कुल यांचे सहकार्य घेत मदत मागितली. मग आमदार कुल यांनी तरूणांना लढा आणि अडचण येईल त्यावेळेस मला हाक द्या असा आत्मविश्वाशी शब्द दिला. कुल यांच्या सहकार्याच्या जोरावर आणि तरूणांचे अपार कष्ट… यामुळे अशक्य होते ते शक्य होत गेले.हे कधीही शक्य नाही असे म्हणणार्यांना शक्य नव्हेते ते या तरुणांनी श्रमदानातुन शक्य करून दाखविले आणि अखेर गावतलावात पाणी पोहचवले… त्यामुळे रोटी गावात आनंदाला पारावार उरला नाही. संपुर्ण गाव आज तरुणाईच्या स्तुत्य उपक्रमा सह आमदारांचे गोडवे गात आहे.