एसआरपीएफ मधील पोलिस नाईकाविरुद्ध ऑन ड्युटी दारु पिऊन गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल
दौंड (BS24NEWS)
राज्य राखीव पोलिस दलातील एका पोलिस नाईकाविरूध्द ऑन ड्यूटी मद्यपान करून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एसआरपीएफ गट क्रमांक सात मधील पोलिस नाईक सोमनाथ पंढरीनाथ रायकर ( रा. ५६५ क्वॅार्टर, एसआरपीएफ गट क्रमांक सात, दौंड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करून सकाळी सव्वासात वाजता मैदानावर येऊन त्याने गोंधळ घातला होता. गटाचे समादेशक वसंत परदेशी यांनी ही बाब गंभीरतेने घेत कारवाईचे निर्देश दिले. दौंड पोलिस ठाण्यात एसआरपीएफचे फौजदार वैभव टेकवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ रायकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआरपीएफ गट क्रमांक पाच व सात मध्ये ऑन ड्यूटी मद्यपानाचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु संबंधित मद्यपींची नोकरी आणि त्यांच्या कुटुंबाचे हित विचारात घेऊन वेळोवेळी समज देऊन कारवाई टाळली जात होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत मद्यपी पोलिस अंमलदारांकडून ऑन ड्यूटी मद्यपान करण्याचे प्रमाण वाढून सर्रासपणे शिस्तभंग केली जात असल्याने संबंधितांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.