राहू परिसरात अतिवृष्टी…आठ ते दहा जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश.. व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान…
राहु (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील राहू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे राहू परिसरातील आठ गावांचा संपर्क रात्री तुटला होता.
राहू गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे तसेच चाऱ्यांची साफसफाई न झाल्यामुळे ओढ्याचे पाणी राहू गावातील सुमारे 50 व्यापारी गाळ्यांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच एक स्विफ्ट गाडी पाण्यात बुडाली आहे.
राहू येथील नवले मळा परिसरातील ओढ्याच्या पाण्यात एक पिकअप गाडी वाहून गेली असून या गाडीतील तिघांना स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.
राहू- टेळेवाडी ला जोडणाऱ्या थोरल्या विहिरीच्या ओढ्याच्या पुलावर पाणी वाढल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.थोरली विहीर येथील ओढ्याच्या पाण्यात कांद्याची वाहतूक करणारा टेंपो अडकला होता. त्यातील पाच सहा जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले.
राहू-दहिटणे यांना जोडणाऱ्या सटवाईच्या ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच वाळकीला जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.