क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

पुणे – सोलापूर महामार्गावर १९लाखांचा गुटखा पकडला, दौंड पोलिसांची कारवाई

दौंड(BS24NEWS)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) येथे पोलिसांनी बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यास पाठलाग करून खडकी गावच्या हद्दीत पकडले. पोलिसांनी पिकअप वाहनांसह १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. नामदेव मधकुर लवटे (वय २७, रा. निजामपुर, कोकरे मळा, ता. सांगोला, जि. सोलापुर) व दत्तात्रय पांडुरंग खांडेकर (रा. खैराय, सिध्दोबा मंदीराजवळ, ता. जत, जि. सांगली) असे या याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनचालक व सहायकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बी. आर. बंडगर, पोलीस नाईक गोरख मलगुंडे, एन. एस. भागवत, एस. टी. डाळ व कुरकुंभ पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार एस. एम. शिंदे, पोलीस नाईक एम. एम. पवार हे पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचे हद्दीत सोलापूरकडुन पुणेकडे जात असलेला एक महेंद्रा पिकअप गाडीचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला; मात्र पोलीस दिसताच

पिकअप वाहनचालकाने (एमएच १२ क्युजी १०४३) भरधाव वेगाने वाहन पळविले. पोलीसांना संशय आल्याने खासगी गाडीने पाठलाग करुन त्यास खडकी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल आकांक्षा समोरील मोकळ्या जागेत गाडी थांबवून पकडले.

या पिकअप वाहन चालकास ताब्यात घेवून वाहनामध्ये काय आहे, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर तपासणी केली असता गाडीत पाठीमागील हौदयामध्ये गोण्या दिसून आल्या. गोण्याची पाहणी केली असता त्यातील सहा गोण्यामध्ये विमल गुटखा (पान मसाला), २२ गोण्यामध्ये छोटा विमल गुटखा (पान मसाला), ६ गोण्यामध्ये तंबाखु असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेत महेंद्रा बोलेरो पिकअपसह १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

रावणगाव चौकीचे पोलीस नाईक गोरख मलगुंडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्याने दौंड पोलीस स्टेशनला बेकायदा गुटखा साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी अन्नसुरक्षा व अन्न व औषध प्रशासन व अन्नपदार्थ बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. आर. बंडगर हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!