महाआवास अभियानातील विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण ७ डिसेंबर रोजी
पुणे(BS24NEWS)
महाआवास अभियान पुरस्कारांचे वितरण बुधवार ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विधान भवन मुख्य सभागृह येथे करण्यात येणार आहे.
महाआवास अभियान कालावधीत पुणे विभागात अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे जिल्हे, तालुके, ग्रामपंचायती, शासकीय जागा उपलब्धतेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके, वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके यांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ही निवड केली आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी पुणे विभागात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.