प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या कामाला गती मिळणार, आमदार कुल यांची लक्षवेधी, मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर
दौंड(BS24NEWS)
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रस्तावित पुणे रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावावा व बंदनळी कालवा तयार करून उपलब्ध जागेचा वापर शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी करावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात त्यांनी उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेवेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, पुणे आणि परिसरातील शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असून अनेक वाहने शहरातून जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने रिंगरोडची आखणी केली असून त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्याबरोबरीने वहातुकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात अनेक जड वहाने देखील शहरातून ये – जा करत असतात. त्यामुळे स्थानिकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने शहराच्या रिंगरोडचा प्रश्न तातडीने हाती घ्यावा, जेणे करून शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी वाहून नेण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. तेव्हा खडकवासला कालवा ते फुरसुंगी पर्यंत बंदनळी कालव्याची निर्मिती करून उपलब्ध जागेचा वाहतुकीसाठी वापर करता येऊ शकेल, अशी मागणी देखील आमदार कुल यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी उत्तर देताना प्रभारी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कि, पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. पश्चिम भागातील निवाडे हे फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर सुमारे पुढील दोन महिन्यांच्या काळात ही रक्कम अदा केली जाणार आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. यासाठी मोबदला दुप्पट केला आहे. या रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले .